उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

५ एप्रिल, २०१०

त्या सा-या जणी आणि तो पो-या….

दुपारीची वेळ असल्यामुळे ऑफिसेस सुटायला अवकाश होता.आज दादरहून सुटून बोरिवलीला जाणा-या लोकलला गर्दी तशी कमीच होती.सेकंड क्लासच्या लेडीज डब्यात बसायला बरीच जागा होती. लेक्चर बंक करून पळालेली एखादी दुसरी कॉलेज कुमारीका, दुपारी सुटणा-या शाळेतून मुलांना घरी घेऊन जाणा-या दोन चारा आया, पांढ-या साड्या नेसून समाचाराला निघालेल्या गुजराथी दोघीतिघी,भाजीचं रिकामं टोपलं घेऊन जाणारी भाजीवाली आणि एक फाटके कपडे घातलेला कळकट पोरगा. बस. एवढेच जण! कसा निवांत होता डब्यात आज!
ट्रेन जराशी हलली. तेवढ्यात छानसे कपडे घातलेल्या काही फेशनेबल स्त्रिया घाईघाईने डब्यात शिरल्या. खिडकीची जागा पाहून त्या पाच सहा जणी स्थानापन्न झाल्या.त्या प्रत्येकीकडे ब-याच पिशव्या होत्या.त्यावरून सोन्या चांदीबरोबरच साड्या, सलवार कुर्ता, काचेचे टी सेट, आकर्षक खेळणी, तसंच किडूक मिडूक सामानाची खरेदी झालेली दिसत होती. प्रत्येकीच्या चेह-यावरून मनसोक्त खरेदी केलेल्याचा आनंद ओसंडत होता. पण विविध वस्तूंची पहाणी, ठराविक वस्तूंचं बारीक निरिक्षण, त्यापैकी एखाद्याच वस्तूची निवड, प्रत्येक वस्तूवर स्वतःचे असं मतप्रदर्शन शिवाय युध्दपातळीवरची घासाघीस आणि शेवटी यशस्वी झालेल्या खरेदीची ती जड जड ओझी ...या सर्वांमुळे सगळ्याजणी फार दमलेल्या दिसत होत्या.
आता ट्रेनने दादर स्टेशन सोडलं.गाडीने जरासा वेग घेतला आणि खिडकीतून येणारा वारा सर्वांना सुखावू लागला.
त्या घासाघीस विरांगनांपैकी एकीने आजूबाजूच्या सिटवरच ठेवलेल्या प्लास्टीकच्या छोट्या पिशवीतून तेलकट कागदाची पुडी काढली. दोरा सोडला आणि त्या लोकलच्या पूर्ण डब्याभर बटाटा वड्याचा घमघमाट सुटला.त्या घोळक्यातील सर्वांनी पटापट एकेक उचलला आणि त्यावर तळलेल्या मिरच्यांसोबत ताव मारू लागल्या.
खरेदीच्या मजेदार गप्पा रूचकर वड्याची चव अजूनच वाढवत होत्या...
“त्या मॉडर्न सेंटर मधल्या साड्या ऑउट डेटेड वाटल्या नाही का?"
"म्हणून तर सेल लावला होता तिथे."
"आणि प्राईस ही म्हणूनच चि S प होती नं."
“मला किनई दोन-चारशे रूपये जास्त गेले तरी चालतात. पण क्वालिटी चांगली लागते बाई. रंग बिंग जायला नको एका धुण्यात”
"खरं आहे. आता मी घेतलेल्या टिकल्यांच्या कुर्त्याची मला तीच काळजी वाटते आहे.”
"पुढल्या किटी पार्टीला घालून जायचा विचार दिसतो आहे या हिरोईनचा."
"हो तर. तोच घालून जाईन आणि चांगली जळवेनच म्हणते माझ्या सोसायटीतल्या महामायांना."
गप्पा संपत नव्हत्या. पण बटाटे वड्याचा दुसरा राउंड मात्र लागलीच खतम झाला.
मिरच्यांची देठं उरलेल्या तेलकट कागदाला दोरा गुंडाळून एकीने तो सिटखाली टाकला.
"ए SSS लड्डू लो S, वेफर्स लोS, चकली, चिवडा लोS बायSSS"
छोट्या छोट्या पुडक्यातून चटकमटक पदार्थ विकणा-या बाईने अजूनही भूकेल्या दिसणा-या त्या घोळक्याला अचूक टिपलं आणि त्यांना काही पदार्थ विकण्यास ती यशस्वी ही झाली.
एकीने कुरकुरीत वेफर्सची आणि खमंग चकलीची पिशवी फोडली. तेवढ्यात एक लहान भिकारीण समोर येऊन समोर ठेपली. आशाळभूतपणे त्या खाण्याकडे पहात चेहरा अधिकाधिक केविलवाणा करत हात पुढे करून उभी राहिली
" ए,चल. आगे जा."
" भिख नही मांगनेकी. कुछ काम कर."
" काम करेगी तो ही पैसा मिलेगा. समझी क्या?"
"अब निकलती है की नही?"
भिकारीण निराश होउन पुढल्या स्टेशनवर उतरली खरी पण जाताना तिने आपला विषय मात्र मागे सोडला होता.ओढणीखाली लपवलेले वेफर्स, चकली पुन्हा बाहेर आले आणि सर्व तोंडं खाण्यासोबत गप्पांसाठी सुरू झाली.
"काय तरी या भिकारणी? काम, धाम नको करायला. नुसता फुकटचा पैसा हवा."
"कशाला द्यायचं काही? या अधिकच सोकावतात मग."
" शरीराने धडधाकट या. कामं नको करायला. आळशी मेल्या."
ती बोरिवलीच्या दिशेने धावणारी लोकल ट्रेन स्टेशन्सबरोबर गप्पांचे विषयही बदलत होती.
" आता घरी जाणार आणि बेडरूमचा ए.सी. लाऊन मस्त ताणून देणार तास भर"
"मला नाही बाई आराम मिळायचा. माझी कूक येईल आता. सगळ कसं सांगून सांगून करून घ्यावं लागतं तिच्याकडून. गेल्या गेल्या चहा मात्र आयता मिळेल हं ."
" मी किनाई आधी सर्व ड्रेसेस घालून बघणार. मग बाकीची सर्व कामं "
नमकिन खाणं खाउन रिकाम्या पिशव्या सिट खाली गेल्यानंतर लहान संत्री बाहेर आली. संत्र्यांच्या साली पुन्हा सिट खाली टाकून फोडी खाता खाता त्या सा-या जणी घरी गेल्यानंतर काय काय करणार याची आखणी करत होत्या.
स्टेशन्स येत होती, जात होती. लेडिज डब्यात बायकांची चढ-उतर ही चालू होती.
तेवढ्यात त्या खरेदी करून परतणा-यांपैकी एकीच्या पायाला काहीतरी हुळहुळल्यासारखं वाटलं. "आउच!" असं म्हणून सलवार ऊंचावून पाय वर घेत तीने खाली वाकून पाहिलं.
तिच्या सिटच्या बाजूला तो दादर पासूनच डब्यात चढलेला कळकट मुलगा दिसला.त्याने निळसर मळकी लांब पँट घातली होती. ती कुठे ना कुठे तरी फाटली होती. अंगात मापापेक्षा मोठा बिनबाह्याचा बनियान होता. तो कधी काळी सफेद होता असे कुणाला सांगितलं तर साफ खोटं वाटेल असा त्याचा रंग झालेला होता. पोराचे केस विस्कटलेले होते आणि कपाळावर घाम साचला होता. त्याच्या हातात एक घाणेरडं फडकं होतं. दोन्ही पाय दुमडून खाली बसून तो सिटखालचा, अधला-मधला केर गोळा करत होता. एकेका सिटखाली जाऊन प्रत्येक बारीक सारीक कचरा गोळा करत होता.फाटक्या पिशव्या,प्लास्टिकचे चहाचे ग्लास, वाळके गजरे, केळ्याची, संत्र्याची सालं, जुनी तिकीट, कागदाचे कपटे, असं काही बाही जमा करून, उचलून ट्रेनच्या दाराबाहेर टाकत होता. हे करतानाच तो सिटवर बसलेल्या बायकांकडे हात पसरून पैसेही मागत होता.
त्या खाबू घोळक्यासमोरही तो आला आणि नुकतीच मिळालेली एकदोन नाणी वाजवून त्यांचं लक्ष वेधू लागला.
" पूSअSर बॉय!" असं म्हणून एकीने एक रूपयाचं नाणं पर्स मधून काढलं आणि त्या पोराच्या हातावर अलगदच टाकलं. त्या पोराच्या मळलेल्या हाताच्या बोटाचा पुसटसा स्पर्श झालेला कळताच तिने पर्समधून वेट टिश्यु बाहेर काढला आणि स्वतःचा हात खसा खसा पुसला. तो वापरलेला टिश्यु आता सिटखाली टाकायला मात्र ती धजावली नाही. ट्रेनच्या खिडकीला लावलेल्या जाळी खालून तीने तो हळूच बाहेर सारला आणि पुन्हा गप्पात सामिल झाली.
काही वेळातच सर्व डबा स्वच्छ झाल्यासारखा वाटला. त्या पोराने पुन्हा एकदा सर्व सिटखाली नजर टाकली. पुन्हा दिसलेला कागद, वेश्टण उचलून लोकलच्या बाहेर भिरकावला आणि डब्याभर फिरून पुन्हा प्रत्येकीकडे हात पसरू लागला. कुणी साफ दूर्लक्ष केलं तरी कुणी टेकवले चार-आठ आणे हातावर.
काही वेळातच बोरिवली आलं. सगळ्या बायका खाली उतरल्या. डबा रिकामा झाला. पोराने दुस-या दाराशी ते मळकट फडकं टाकलं आणि त्यावर बसून हातातली नाणी एकेक करून मोजू लागला.
इतक्यात एक भेळवाला त्या डब्यात चढला. कडेने पुठ्ठे उभारलेलं शेव चुरमु-याचं टोपलं सिटवर ठेवलं. त्याने आधी भेळ कालवले भांडं नीटसं निपटून ठेवलं.  चुरमुरे गरम ठेवणा-या कोळश्याला फुंकर मारून त्यावरचा  निखारा पारखून घेतला आणि आपल्या धारधार पातीच्या सुरीने कांदा कापू लागला.
तो पोरगा लागलीच  उठला. पँटच्या खिशात ते मळकं फडकं सारलं आणि भेळवाल्याजवळ जाउन "एक रूपया कम है" असं काहीश्या दयेच्या आशेनं सांगितलं. काही न बोलता पोराकडे एक क्षुद्र नजर टाकून भेळवाल्याने कापलेला कांदा टोपल्यातल्या लहान डब्यात ठेवला.
पोराने टोपल्यातील शेवेच्या राशीकडे दीनवाणे पाहिलं. कांदा, चटणीचा वास त्याच्या नाकात शिरला. तोंडात लाळ घोळली आणि पोटातही खड्डा पडल्यासारखं झालं.
भेळवाला टोपल्याच्या बाजूची कागदं वर-खाली करून नीट आत खोचत होता. त्याचा चेहरा अजूनही निर्विकार होता.
तेवढ्यात विरूध्द प्लॅटफॉर्मवरच्या ट्रेनच्या सुटण्याचा भोंगा झाला. पोरगा मागे वळला.
त्याने त्याच्या ट्रेनच्या दरवाज्यातून त्या समोरच्या ट्रेनच्या आत एक नजर टाकली. आतल्या सिटखालचा कागद त्याला दिसला आणि त्याचे डोळे चमकले. त्याने नाणी असलेल्या हातांची मुठ आवळली. पाय ओढत प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि आकांताने धावत जाऊन स्टेशन सोडणारी ती ट्रेन पकडली.
एका रूपयाची कमतरता भरून निघण्याची शक्यता त्याला तिथे दिसली होती.

(छायाचित्रे जालावरून साभार.)

३ टिप्पण्या: