उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१९ जून, २०११

पितृदिन

          आज Father`s day. माझ्या जन्मानंतर पहिल्यांदाच या पितृदिनी तुम्ही  आमच्यात नाही. होतात तेव्हा   कधी  पाश्चात्य संस्कृतीत  म्हणतात त्यासारखे “HAPPY FATHER`S DAY” असं म्हटले नाही.  तो वडिलांबद्दल प्रेम, आदर दाखवायचा सण आहे. पण मला तेव्हा तरी  ते जरा औपचारिकच वाटायचे. आपल्या नात्यात ती औपचारिकता कधीच  नव्हती. तुमचा गंभीर स्वभाव दाखवणारा  प्रौढ चेहरा, माझ्या खोड्या आणि चेष्टांमुळे क्षणात पालटायचा  आणि आपल्यातलं नातं मित्र-मैत्रिणीसारखं खेळकर होऊन जायचं. त्यातही तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर भरून उरायचा.  शिवाय तेव्हा तुम्ही होतात.  मुद्दामून वेगळी आठवण  काढून तशी शुभेच्छा  व्यक्त करावेसे वाटलेच नाही. HAPPY राहायची एकमेकांबद्दलची इच्छा आपल्या मनात नेहमीच असायची. त्यासाठी विशेष असा दिवस निवडून त्यादिवशी विशेष प्रकारे प्रदर्शन करायची जरूरीच नव्हती.
इतके दिवस गृहीतच धरले होते. नव्हे तसेच होते. तुम्ही इथे होतात. आज नाही आहात म्हणून उणीव जाणवते आहे आणि आज तुमची अधिकच आठवण येते आहे.  केवळ ‘आज‘च्या दिवशी तुमची  आठवण येते आहे असे म्हणणे चुकीचेच ठरेल. कारण तुम्ही गेल्यापासून तुमची आठवण आली नाही असा एकही दिवस नाही, एकही क्षण नाही.
प्रत्येक संकटांना सामोरे जायची तुमची धडाडी असायची. त्यांना तोंड द्यायची तुमची  मानसिक, शारीरिक ताकद होती. सतत कार्यरत राहाण्याचा तुमचा हट्ट असायचा. सांगीतिक, सांस्कृतिक, कौंटुंबिक समारंभात आयोजन-नियोजनापासून  उत्साहात सहभाग असायचा.  इतकेच काय   किचकट सरकारी, दप्तरी कामातही  कंटाळा नसल्यामुळे कधीही दिरंगाई व्हायची नाही. कुणाचेही  चांगले व्हावे ही हितवर्धक भावना नेहमीच असल्यामुळे योग्य मार्गदर्शन  करून त्यासाठी आवश्यक असलेली कुठल्याही प्रकारची मदत करायला तुम्ही सतत तयार असायचा.  आपले काम बाजूला ठेवून  त्यांचे ते काम पूर्ण करण्यात तुमचा हातखंडा होता असे म्हटले तरी चालेल. तुम्हाला दिलेले काम पूर्ण होणारच याची प्रत्येकाला  खात्री  असायची. त्यामुळेच कधीही, कुठलीही आणि काहीही अडचण आली की तुमचा आधार वाटायचा. आज  त्या प्रत्येकाला तो आधार नाहीसा झाल्याची खंत आहे. संरक्षक पित्याचे छत्र हरवल्याचे दु:ख माझ्यासारखे त्यांनाही आज होत असेल.
आजच्या Father`s day च्या दिवशी  का कुणास ठाऊक पण आपल्यात एक औपचारिकता आली आहे असे मला वाटते. तुम्ही कुठे आहात  ते मला माहित नाही. कसे असाल अशी मनात काळजी आहे. तुम्ही कुठेतरी दूर गेला आहात हे  निश्चित आहे. त्यामुळे एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला आहे असेही वाटते.  म्हणूनच आपल्यात ही औपचारिकता आली  आहे का?
तुमच्या संपूर्ण जीवनात तुम्हाला कष्ट करायला लावणारी नियती शेवटी थकली आणि अखेर कंटाळून तुमच्या जीवनाशी मांडलेला डाव मोडून गेली. त्यात जिद्दीने खेळून त्यातून तुम्ही एकदाचे सुटलात. खरंच ‘सुटलात‘!  तुमची तशी  सुटका ही  नियतीने जाता जाता निर्दयतेने तुम्हाला निःशस्त्र  आणि असहाय करून दिलेला प्राणघातक फटकारा म्हणू की तुम्ही जर्जर झालेले पाहून कीव येऊन नियतीने केलेली दया?   
तुमच्या जीवनात आधी  कष्टाची गरज होती. मग त्याची  सवय झाली  आणि त्यानंतर  कष्टांचीच आवड निर्माण करणा-या  तुमच्या त्या  आयुष्याचा शेवटही असा वेदनामयी व्हायला नको होता  असे  मात्र सारखे वाटते. अगदी तेव्हाच, तुम्हाला आणि विशेषत: तुमच्या   जीवनातील  यातनामयी अंताला विसरणे गरजेचे आणि अपेक्षित आहे असेही  समजते आहे. तरीही ते शक्य होत नाही आहे. कुणीही अमरत्व घेऊन जन्मलेले नाहीत. आता तुमची कायमची राहणारी गैरहजेरी  हीच वास्तवता आहे आणि  तेच मान्य करावे लागते आहे.
खंबीर आधार देणार पिता हरवल्यामुळे, आई हयात असूनही अनाथ झाल्यासारखं वाटतंय. आज  मी याच दु:खात आहे तरीही wishing you,  "VERY HAPPY FATHER`S DAY"


२ टिप्पण्या:

  1. खूपच हृद्य झालंय लेखन.
    पहिल्यांदाच तुझ्या बाबांना पाहतोय...
    चेहर्‍यावरचे हास्य अगदी प्रसन्न करणारे आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. Namaskar....mazya kade shabd hi nahiyet purese... janu maaz man tumhi vachalat ani ha lekh lihilat... itak samya aahe ya feeling madhe, khar tar agadi ashech aahet maze baba pan !!! Je aaj khup sundar asha thikani nivant, anandi asavaet ashi prarthana karate!!!!

    उत्तर द्याहटवा