उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१५ सप्टेंबर, २०११

यथार्थ गीत

सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. आपल्या पितरांची विशेष आठवण काढायचे दिवस.
माझ्या
 बाबांच्या मृत्यूनंतरचा आलेला हा पहिलाच पितृपंधरवडा.

त्या निमित्ताने माझी  ही भावपूर्ण श्रद्धांजली.




यथार्थ गीत
कधी तरी पहाटे पहाटे माझा डोळा लागायचा. दुस-या खोलीत काय स्थिती झाली असेल या चिंतेने खडबडून जाग यायची.  निरुत्साही आणि निराश मन शरीराला बिछान्यातच अडकवून ठेवायचं. उठावसं वाटायचंच नाही.  आणि मग मनात अपराधी वाटायचं. मी झटकन उठून  त्या खोलीत जात असे. तिथे बिछान्यावर  डोकावून पाहत असे. भिंतीकडे तोंड करून पडलेलं ते शरीराचं मुटकुळं पाहून डोळ्यातली झोप पार उडून जायची. माझ्या पोटात कालवाकालव व्हायची. तिथे वाकून  गूड मॉर्निंग. झोप झाली का? असं  विचारलं की कधी उत्तर मिळायचं तर कधी नाही.
पांघरूण  नीटसं  करून  मी माझी आवरा सावर करून घ्यायची. आणि  सकाळचे साडे सात व्हायची वाट पाहत बसायची.  त्याआधी बिछाना, पांघरूण ओलं झालेलं दिसलं की दिवसाच्या कामाला लगेचच सुरवात व्हायची.  पाय दुमडून पोटाशी घेतलेलं  ते बिछान्यावरचं मुटकुळं सोडवायचं, पाय ताठ करून शरीर पाठीवर वळवून त्याखालची ओली चादर बदलायची आणि, चला उठा, उजाडलं. चहा घ्यायचा आहे ना? असं म्हणून त्या शरीराला जागं करायचं.
तीव्र औषधांच्या गुंगीमुळे झोपेच्या अधीन असलेलं ते शरीर  माझ्या म्हणण्यावर फारसं प्रतिक्रिया द्यायचं नाही.  पुन्हा ते मुटकुळं पडून राहायचं,.. प्राणहीन झाल्यासारखं...
त्यावर  आम्हाला काहीसा उपाय सापडला होता. तो म्हणजे संगीत. त्यांना संगीताची अतिशय आवड. उपजत गायनाची कला असलेले ते उत्तम गायक होते. सूरांचा अभ्यास केला नसला तरी त्याचे ज्ञान खोलवर  होते.  पेटी वादनातही ते पारंगत होते.  त्यांच्या  सध्याच्या बेधुंद मनाचा ठाव  घेऊन त्यांना बोलतं करायला संगीताचा दुवा आम्हाला गवसला होता. त्यांच्या आजारी शरीरातील सैरभैर झालेल्या मनाला खूश करायची  एकही संधी आम्ही सोडत नव्हतो.
घरातील काही  ठीकठाक असलेल्या सी.डीं.पैकी एक व्हायलीन वाद्याची सी.डी. त्यांना पूर्वीपासून आवडायची. आताही  ती लावली की त्यातील पहिल्या गाण्याचे  सूर वाजायला लागायचे...   
ते एक  प्रसिद्ध गाणं, त्याचे शब्द.... अगदी यथार्थ.  जणू काही त्या व्यक्तीसाठीच लिहिल्यासारखे...ह्या अश्या  वेळेला अगदी अनुरूप...
दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
 पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
ती पराधीन  झालेली व्यक्ती- माझे बाबा.
बरीचशी  गुप्तता राखून गनिमी काव्याने  कर्करोग त्यांच्या  शरीरात शिरला आणि शरीराचे मुख्यालय- मेंदू, त्यावर त्याने कब्जा केला.  प्रभावी औषधी उपचार सुरू असले तरी बलाढ्य अश्या त्या शत्रूरोगावर मात करणे अशक्य होत होतं. रोगापुढे नमतं घेऊन त्याला शरण जाण्याशिवाय पर्यायच नव्हता.  तो रोग दिवसेंदिवस  अधिकाधिक स्वत:ची मनमानी करत होता. हाती आलेल्या शरीराची पार धूळधाण करत सुटला होता. एक एक अवयव  करत सर्व शरीर ताब्यात घेऊन  त्यावर तो  रोग आपले महाराज्य  प्रस्थापित करत होता. अत्यंत कार्यक्षम आणि कष्टकरी शरीरातील मेंदूत आपलाच असा कुठलासा विस्कळित विचार  चालत असायचा. वेळ काळाचं भान तर केव्हाच हरपून गेलं होतं. रोगामुळे पायातली शक्ती हळू हळू गळून जात होती. बेरूप चेह-यावरचे डोळे भावनारहित दिसायचे. -याचदा ते बंदच असायचे...  स्वत:तच हरवल्या सारखे... 
आपल्या सार्वभौमी सत्तेची लज्जत अधिक वाढवण्यासाठी की काय त्या रोगाने मेंदूत काहीश्या संवेदना अजून शिल्लक ठेवल्या होत्या. विस्कळित झालेलं डोकं बिचारं  गोंधळलेल्या अवस्थेत होतं पण त्याला काहीश्या भावना आणि संगीताची जाणीव अद्याप होती. तीच आम्हा सर्वांना उमेद देत होती.  संगीताचे सूर वाजले की डोळे बंद असले तरी त्या शरीरात  प्राण आल्यासारखा व्हायचा. जडावलेले डोळे सूरावटीचा वेध घेत उघडू लागायचे. मग मी पलंगाच्या कडेची चावी फिरवून बिछान्याची डोक्याकडची कमरेपर्यंतची बाजू  वर करायची आणि  हातांच्या आजूबाजूला उश्या लावून बाबांना बसतं करायची.  सुमधुर सूर स्पष्टपणे कानाव पडल्यावर एकीकडे कलंडलेलं डोकं सरळ व्हायला बघायचं.  इतकंच नव्हे तर बोटं गादीवर ताल  धरू पाहायची आणि  समेवर  चुटकी वाजवता येत नसली तरी मान किंचितसा ठेका द्यायची. ते पाहून आमच्या डोळ्यात अश्रुधारा लागायच्या, कारण त्या व्हायलीन मधून येणा-या सूरांचे शब्द आम्हाला कळत होते. समजत होते. आणि  त्या बोलांची यथार्थता उमजत होती. 
त्यांचे अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्व पार लयाला  गेलं होतं. अत्यंत  सज्जन अश्या या व्यक्तीच्या नशिबांत हे पराधीन जीवन का यावे याचा प्रश्न पडायचा. ना कशाचं व्यसन, ना कुठलं पाप. मग असं का व्हावं? या प्रश्नाचे उत्तर  त्या गाण्याच्या बोलात आम्हाला मिळायचं.
दैवजात दुःखे भरतां, दोष ना कुणाचा.
बाबा जे भोगत आहेत  तो त्यांचा दोष नाही.  या सृष्टीवर मानवाला  बनवले आहे ते पराधीन असंच.    ही व्यक्ती, मग  ते माझे बाबा असले तरी ती अपवाद  कशी असू शकेल? खरं तर कुणीच याला अपवाद नाही. संपूर्ण जगात प्रत्येक मानवाच्या दैवात दु: आहे.
तो अर्थ  काहीसा मान्य करायला लावून ते सूर आम्हाला आमचं कामं सोपं  करून द्यायचे.  बिछान्यातच उश्यांच्या आधाराने बसलेल्या बाबांचे दात मी घासून द्यायची.  तोंडाला पेला लावून पाणी  द्यायची. चूळ भरण्याच्या सूचना वारंवार  देऊन; सूर, तालावरचे लक्ष विचलित करून  मी तोंडातलं फेसाळलेले पाणी लहानश्या टबात गोळा  करायची. पुन्हा पाणी प्यायला  देऊन तोंड धुवायचे काम कसं बसं करून घ्यायची. आणि मग  गाण्यांच्या, सूरांच्या साथीने इंजेक्शन, औषधे, नाश्ता वगैरे ठरलेला  दिनक्रम सुरू व्हायचा.
सर्व शरीर पूर्णपणे परावलंबी झालेलं होतं. स्वत:हून काही करायचा विसरच पडला होता. ते शरीर जणू सुट्टीवरच गेलं होतं.  अत्यंत कार्यरत अश्या  शरीराला सक्तीचा आराम का घडावा? तो आराम सुखकारी असेल तर ठीक. पण असा वेदनामयी का?
अर्थात शरीराचे केंद्रस्थान-मेंदूला नियंत्रणाखाली ठेवलेल्या कर्करोगाने एक  दया केली होती बाबांवर. त्यांना वेदना   फारश्या कळतच नव्हत्या.  त्या यातना त्यांच्या अकार्यक्षम झालेल्या बेचैन शरीरातून, चेह-यांवरच्या अस्वस्थ अवस्थेवरून आम्हाला सहजी कळायच्या. पण त्यांच्या भोगातून मात्र बाबांची सुटका झाली होती.
डोकं दुखतं आहे का? काय होतंय या प्रश्नावर काहीही होतं नाही आहे. आय एम ऑलराईट.  काहीसा थकवा वाटतो आहे. असे उत्तर बाबांकडून मिळायचं.
पूर्वायुष्यात आम्हाला माहीत असलेले चुकीचे  असे  त्यांनी काही केलेलं नाही की ज्याची एवढी भली मोठी शिक्षा त्यांना मिळावी. असं आपल्या बाबतीत का व्हावं? त्यांना  स्वत:बद्दल  असा प्रश्न पडत असेल का? असं वाटायचं. कदाचित तेव्हा त्यांनी  त्या गाण्यातले शब्द समजून घेतले असावेत. आणि त्यांनी मान्य केले असावं की
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
कधी कधी मी आणि बाबा एक खेळ खेळत असू. व्हायलिनचे सूर वाजले की मी त्यांना गाण्याचे शब्द विचारायची. ते ही हुरुपाने खेळात भाग घ्यायचे आणि डोक्यातल्या  गाठींच्या अडथळ्यांमधून नागमोडी वळणावळणाने धावून त्यांचे विचार  थकायचे.  कधीमधी ओळींच्या मधलेच एखाद दोन शब्द आठवायचे. पण -याचदा बाबा  ती चाल आपल्या कृश आणि तुटक्या स्वरात गुणगुणून शब्दांना शोध राहायचे. काही वेळाने मी  गाण्याचे शब्द गाऊन दाखवले की त्यांच्या अपयशाने म्हणा किंवा अचूक शब्द सापडल्याच्या आनंदात म्हणा, हळवेपणाने लहान मुलासारखे ओक्साबोक्शी रडायचे.  मलाही  रडायला मोकळे सोडून....
जरामरण यांतून सुटला कोण प्राणिजात
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनात?
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
त्यांचा स्वभावच समजावून घेण्याचा.  समजून, उमजून जबाबदारीने  वागण्याचा.  पुढे आलेल्या  संकटांना  धैर्याने तोंड  द्यायचा. दुस-यांच्या प्रसंगांत मदतीचा हात पुढे करून  मागे उभे राहायचा.
ते नेहमी म्हणायचे, संकटं येतच राहणार. घाबरायचं काय त्यात?”
ह्या रोगाची त्यांना कल्पना होती की नाही ते माहीत नाही. पण  ते घाबरून गेलेले कधी दिसले नाहीत. खरं तर  दिवसेंदिवस रोग अधिकाधिक शक्तिशाली होत होता तर  बाबा मात्र शक्तिहीन.  आपण केलेले वैद्यकीय उपचार त्यांना जीवन देताहेत की मरण याचा संभ्रम मनाला पडायचा. समोर ठाकलेली मृत्यूची चाहूल वाकूल्या दाखवायची. त्यांच्या या रोगाने पछाडलेल्या शरीराकडे पाहून मन पिळवटून जायचं. आमच्या मनातील   तीव्र निराशा  डोळ्यांच्या कडा ओलांडून बाहेर पडायची तेव्हाच नेमक्या ओळी कानावर यायच्या...
जिवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्नीच्या फळांचा?
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
त्यांची जायची  वेळ समीप आली तेव्हा त्यांच्या या मरण यातनेतून सुटका होणार होती ते  माझ्या मनाने कबूल केले होते.  ते तसेच  व्हायला हवे हे मानले होते. पण जेव्हा ती वेळ आली तेव्हा असं व्हायला नको होतं असं वाटायला लागले. पितृछत्र हरवल्याची कळ हृदय छेदून गेली. डोळे थांबून थांबून वाहत होते. त्यांचे शरीर असूनही ते तिथे नव्हते ही गोष्ट पटत नव्हती.   त्यांचा पुढचा वेगळा  असा प्रवास सुरू झाला आहे  हे पटत असून ही वळत नव्हतं. ते  आम्हाला सोडून दूर गेले आहेत हे दु: सहन करण्यापलीकडे  हातात काहीच उरले नव्हतं. मन सावरतं घेण्याच्या प्रयत्नात होतं. जणू  बाबा सांगत होते आणि मन  बाबांचे  ते म्हणणं ऐकत   होतं... 
नको आसू ढाळू आता, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
मरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
आता ते कुठे असतील, कसे असतील अशी मनात काळजी वाटते. आणि ते प्रश्न अनुत्तरित राहतात.
त्यांच्या आठवणी दाटून येतात. आत्ता ते असते तर असं केलं असतं, असं म्हणाले असते, असे असंख्य विचार मनात येतात.
माझ्याइतर नातेवाईकांच्या आणि बाबांच्या मित्रपरिवाराच्या नशिबाने ते आम्हाला लाभले आणि  पुन्हा आमचंच कमनशीब की  त्यांच्या मृत्यूने आमची ताटातूट झाली. ती ही अशी; की पुन्हा  कधी ही भेट होण्यासाठी. बाबा अजून  हवे होते असं  जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा  पुन्हा त्याच  गाण्याच्या ओळी आठवतात.  
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसांचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
अजूनही खूपदा बाबांची आठवण येते. त्यांना  भेटायची इच्छा होते.  त्यांना मन बोलावतं. तेव्हा कानात शब्द घुमतात...
नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ
पण मग  त्यांना आग्रहाने बोलावण्याचे सारे प्रयत्न  फोल वाटायला लागतात जेव्हा ऐकू येतं
पुन्हा नाही येणे, सत्य  हे त्रिवार
पुन्हा नाही येणे, सत्य  हे त्रिवार
वियोगार्थ मीलन होते, नेम हा जगाचा
तेव्हा वाटते की हा वियोग  झाला आहे पण ते पुन्हा भेटण्यासाठी, कधी ना कधी तरी त्यांची भेट होईल  अशी एक आशा वाटते.  आणि  समजूतदार मन वेड्या मनाला समजवतं...
दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

८ टिप्पण्या:

  1. मीनल,खूपच भावपूर्ण लिहिलं आहेस...गाण्याच्या शब्दांचा नेमकेपणा दाखवून दिलास.

    उत्तर द्याहटवा
  2. संयत वाचन,व्हायलिनच्या सुरावटीचे सुयोग्य पार्श्वसंगीत आणि बाबुजींच्या आवाजातले नेमके शब्द योग्य जागी वापरण्याचे कसब...अतिशय उत्तम असे हे अभिवाचन झालंय.

    उत्तर द्याहटवा
  3. मीनलताई, खूपच भावपूर्ण आठवणी लिहील्या आहेत. माझी आई संधिवाताने शेवटची साडे आठ वर्षे अंथरूणाला खिळून होती. ऑगस्ट २००३ मध्ये गेली. तुम्ही जे काही वर्णन केलं आहे या सगळ्यातून मी गेलेली आहे. येवढच सांगते.

    उत्तर द्याहटवा
  4. :( :( :(

    काय बोलू सुचत नाही...काळजी घे गं...!!

    उत्तर द्याहटवा
  5. रडवलंस ग! माझ्या बाबांचं अखेरचं अगतिक आजारपण आठवलं! त्यांनाही संगीतानंच तारलं होतं.
    फार फार चटका लावून गेलं तुझं लिखाण.

    उत्तर द्याहटवा
  6. लेख छान आहे, अभिवाचनही तांत्रिकदृष्ट्या सरस, गाण्याचा उपयोग आणि इफेक्ट सुपर्ब.

    उत्तर द्याहटवा
  7. मीनल पोस्ट समजली इतकच म्हणेन.... तू सहन केलयेस हे सगळं ..... पोस्ट खरच मनाला चटका लावून गेली!!! :(

    उत्तर द्याहटवा